Monday, November 14, 2011

विज्ञान आणि मुले


विज्ञान आणि मुले
१४ नोव्हेंबर २००८ रोजी भारताचे चान्द्रयानातील मून इम्पक्ट प्रोब चांद्रभूमीवर आदळले, ज्याने चंद्रावर पाणी असल्याचे सबळ पुरावे मिळविले. अमेरिकेला गेल्या ४० वर्षात अनेक मोहिमांमध्ये जे जमले नाही ते दैदिप्यमान यश भारताने पहिल्या मोहिमेत मिळविले. ये यान १४ नोव्हेंबर रोजी चंद्रावर गेल्यामुळे मुलांचे लाडके डॉक्टर अब्दुल कलाम यांनी हे वैज्ञानिक यश भारतातील तमाम मुलांना समर्पित केले. जेणेकरून या यशापासून प्रेरणा घेऊन अनेक मुलांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात पुढे यावे व देशातील प्रत्येक बालमनात किमान वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा.

मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी:: पालकांचा चिंताजनक दृष्टीकोन
एक चीनी म्हण आहे " मला सांगा मी विसरेन, मला दाखवा कदाचित माझ्या लक्षात राहील, मला सामील करा मला सर्व समजेल" याचाच अर्थ प्रत्यक्ष खेळताना करून पाहिल्यानंतरच एखादी गोष्ट पक्की समजते व दीर्घ काळ लक्षात राहते. असे अनुभवाधिष्ठित शिक्षण आपल्याकडे कोठे आहे? बालविज्ञान चळवळ राबविणे अथवा मुलांना विज्ञान सांगणे हि कोण्या एका विशिष्ट संस्थेची अथवा विज्ञान शिक्षकांची जबाबदारी आहे असे समजून बहुतेक पालक बाजूला होतात. खरे तर वैज्ञानिक समज / वैज्ञानिक दृष्टीकोन हि जगण्याची गरज आहे ती काही चार भिंतींच्या आत शिकविली जाऊ शकत नाही. अगदी लहान वयापासूनच हे संस्कार मुलांवर लागतात. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन असो वा विमानांचा शोध लावणारे राईट बंधू यासारख्या अनेक पाश्चिमात्य शास्त्रज्ञांच्या यशाचे गमक त्यांच्या बालपणात दडलेले आहे. यांना त्यांच्या लहानपणी वैज्ञानिक खेळणी भेट म्हणून मिळाली होती. लहान मुले खेळण्यातून शिकत असतात व त्यातूनच ते जगाशी संपर्क साधतात. पालक म्हणून तुमच्याकडे २ पर्याय आहेत १ म्हणजे मुलांना एखादे वैज्ञानिक / शैक्षणिक खेळण देण कि जे दीर्घकाळ त्याचे मनोरंजन करेल व त्याच वेळी त्याच्या मेंदूला चालना देऊन आवश्यक ते कौशल्य विकसित करेल जे त्या बालकाला त्याच्या उर्वरित आयुष्यात उपयोगी पडेल. यात तुमचा वेळ मुलासोबत घालवणे अपेक्षित आहे. व दुसरा पर्याय म्हणजे बाजारात चलती असणारे एखादे कार्टून अथवा व्हीडीओ गेमचे character किंवा खेळणे जे फक्त तुमच्या घरातील जागा व्यापेल. तुमचे मुल खेळण्यात व्यस्त राहील व तुमचा वेळ वाचेल. निवड तुम्हाला करायची आहे.


दुर्दैवाने विज्ञान खेळणी म्हणजे केवळ शाळेतील सायन्स प्रोजेक्ट साठी वर्षातून एकदा घ्यायची हाच समज आपल्या समाजात सर्वत्र दिसतो. वास्तविक जर लहान मुलांना विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित एखादे खेळणे दिले तर त्याची स्मरणशक्ती, तौलनिक विचार करण्याची क्षमता वाढते. फक्त वयोमानानुसार योग्य वैज्ञानिक खेळण्याची निवड तुम्हाला करावी लागेल. खेळण्यातून ज्या संकल्पना समजतात त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. तुमच्या मुलाच्या इच्छेनुसार त्याचा कल कोणत्या विषयाकडे आहे हे पाहून त्यालाच निवडीचे स्वातंत्र्य दिले तरी चालण्यासारखे आहे. वैज्ञानिक खेळण्यांच्या मदतीने विद्यार्थी पर्यावरणपूरक गोष्टी जसे सोलर कार कशी बनवायची, स्थितीज उर्जा- गतीज उर्जा, अपारंपरिक उर्जांचा वापर आदी गोष्टी सहजगत्या आत्मसात करतात. काही खेळांमधून त्यांचा शारीरिक व मानसिक दोन्हीचा विकास होतो. नुसत्या रिमोटच्या गाड्या व दर्जाहीन व्हीडीओ गेम्स यापासून मुलांची सुटका करा, हि पालक म्हणून तुमची नैतिक जबाबदारी आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जा. एखादी छोटीशी सहल, पक्षीनिरीक्षण, आकाशनिरीक्षण आदीमुळे मुले खूप चिकित्सक व उत्साही बनतात. ते निसर्गाकडे, आजूबाजूच्या गोष्टीकडे विचारपूर्वक, वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला शिकतात ज्यामुळे त्यांची निरीक्षण क्षमता वाढून स्वतः गोष्टी समजून घेण्याकडे कल वाढतो. बऱ्याचदा वैज्ञानिक खेळणी तयार स्वरुपात नसतात तर त्या मुलांना तयार करायच्या असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरील नवनिर्मितीचा आनंद पाहून तुम्हालाही समाधान वाटेल. असेही निरीक्षण आहे कि पारंपारिक अभ्यासक्रमात मागे असणाऱ्या मुलांना वैज्ञानिक खेळणी दिल्यास त्यांचाही अभ्यासाकडे पाहण्याचा - शिकण्याचा दृष्टीकोन बदलतो व ते अधिक उत्साहवर्धक सकारात्मक नजरेने शिक्षणाकडे पाहायला लागतात. आजच्या या बालदिनी आपण आपला दृष्टीकोन बदलुयात हीच खऱ्या अर्थाने चिमुकल्यांना व भावी पिढीला बालदिनाची भेट असेल!!

दिनेश निसंग
९८५००४७९३३

Clear Skies !Dinesh Nisang

No comments:

Post a Comment